एकदा साहित्य जमवले, आणि फळे कापून तयार असली की काही मिनिटातच तयार होते, आणि तितकीच लवकर फस्त होते!
खास करून लहान मुलांची अतिशय आवडती डीश. आंब्याच्या मौसमाचे आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी अतिशय चविष्ट, थंडगार पाककृती. ह्या प्रमाणात ३ ग्लास मँगो पार्फे तयार होईल.
साहित्य:
- ३ मध्यम आकारचे हापूस आंबे, बारिक चिरलेले.
- ३ ते ४ इतर फळे, बारीक चिरलेली. मी १ सफरचंद, २ किवी आणि वाटीभर द्राक्षे घेतली होती.
- स्ट्रॉबेरी किंवा इतर आवडत्या स्वादाचे योगर्ट.
- स्ट्रॉबेरी क्रश ६ मोठे चमचे. इतर कुठलाही आवडता क्रश घेऊ शकता.
- ३ मोठे चमचे बारीक तुकडे केलेला सुका मेवा - मी आक्रोड, काजू आणि पिस्ते घेतले होते.
- थोडेसे मध किंवा बटरस्कॉच सिरप, सजावटीसाठी.
कृती:
- ग्लासात सगळ्यात खाली आंब्याच्या बारीक फोडि टाकून घ्याव्यात. साधारण १ आंबा एका ग्लासासाठी ह्या प्रमाणात.
- आंब्याच्या फोडींवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी योगर्ट टाकावे.
- ह्या योगर्टवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घ्यावे.
- आता ह्यावर बारीक कापलेल्या फळांच्या फोडी टाकाव्यात.
- आता वरून १ चमचा बारीक तुकडे केलेला सुका मेवा आणि ३-४ थेंब मधाचे किंवा बटरस्कॉच सिरपचे टाकावे.
- हे भरलेले ग्लास आता फ्रीजरमधे १५-२० मिनिटे ठेवावेत, ही डीश थंडगार किंवा थोडी बर्फाळच छान लागते - त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे फ्रीजरमधे जास्त वेळ ठेवता येईल.
- बस्स!! फ्रीज मधून बाहेर काढा आणि उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी ह्या थंडगार, स्वादिष्ट 'मँगो पार्फे' वर ताव मारा. लहान मुले असतील तर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर लगेचच फस्त होईल ह्याची गॅरंटी!
लुत्फ घ्या थंडगार मँगो पार्फेचा!