मिठाई आणि डेझर्टस्
हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)
2 posts
• Page 1 of 1
हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)
बेकिंग आणि केक्सच्या पाककृतींचे एक पुस्तक बरेच दिवसांपासून कपाटात आहे असा साक्षात्कार शनिवारी रात्री अचानक झाला. मग बघुयात काही करता येतंय का म्हणून चाळायला सुरुवात केली आणि Gewürzter Honig Kuchen (Honey Cake) ची पाकृ वाचताना लक्षात आले की बहुतांशी सगळे साहित्य हे आपल्या भारतीय स्वयंपाकातील मुलभूत मसाले दिसताहेत. शिवाय करायला सोपी कृती. मग लगेच रविवारी हा प्रयोग करायचा हे पक्के झाले. त्यात काही बदल करता येतील का यावर विचार करून सकाळी सकाळी तयारीला सुरुवात केली. आता प्रयोग आहे, तोही बेकिंगचा म्हणजे तो अपयशी होण्याची शक्यता नाकारणे हे अतीच झाले. कारण यापुर्वी काही यशस्वी तर काही सपशेल अपयशी प्रयोगांचा अनुभव आहे. पण झाला हा यशस्वी तर देऊयात, अशा अति आशावादी आविर्भावात सगळे साहित्य एकत्र केले, पहिला फोटो काढण्यात आला आणि पुढे काम सुरु झाले.
साहित्य -
मैदा - १२५ ग्रॅम
बेकिंग पावडर - १ टीस्पून
सुंठ पूड - १ टीस्पून
दालचिनी पूड - १ टीस्पून
बेकिंग सोडा - १/२ टीस्पून
बटर - ६० ग्रॅम
मध - १०० ग्रॅम
ब्राऊन शुगर - ६० ग्रॅम
१ मोठे अंडे
दुध - १२० मिली
लिंबाची किसलेली साल - १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे
मिश्र मसाले (Lebkuchengewürz - लेबकुखेनगेव्युर्त्स) - २ टीस्पून
यात दगडफूल, सुंठ, बडीशोप, धणे, लवंग, विलायची, जायफळ, मिरे या मसाल्यांची पूड वापरली जाते. याला जर्मन भाषेत लेबकुखेनगेव्युर्त्स असे म्हटले जाते. लेबकुखेन हा नाताळ दरम्यान केला जाणारा पारंपारिक जर्मन केक आणि Gewürz म्हणजे मसाले. हे वरचे साहित्या बघता आपला नेहमीचा चहा मसाला हा याला उत्तम पर्याय. त्यामुळे मी २ टीस्पून चहा मसाला आणि त्यात किंचित जायफळ पूड आणि धणेपूड मिसळली. तुम्ही आवडीप्रमाणे बदल करू शकता.
कृती
ओव्हन १८० डिग्री वर प्रीहिट करायला ठेवा. एका केकच्या भांड्याला बटर लावून घ्या.
मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि सगळे मसाले एकत्र करून घ्या.
बटर, ब्राउन शुगर आणि मध हे सगळे एका भांड्यात मंद आचेवर गरम करा आणि ढवळत रहा. मिश्रण एकजीव होऊ लागले की गॅस बंद करा.
हे मिश्रण हळूहळू मैद्याच्या मिश्रणात ओता. आता यात लिंबाची साल, अंडे आणि दुध घाला.
सगळे एकत्र करून घ्या. थोडे सैलसर मिश्रण तयार होईल.
हे आता केकच्या भांड्यात ओत आणि ३५-४० मिनिटे बेक करा. दालचिनी चा मंद सुवास हळूहळू घरभर पसरू लागेल. केक फुगलेला दिसू लागेल. टूथपिक किंवा सुरीने केक झाल्याची खात्री करून घ्या आणि ओव्हन बंद करा.
आता हुश्श म्हणून प्रयोग यशस्वी झाल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला आणि याचे नामकरण काय करावे असा विचार मनात आला. भारतीय मसाल्यांचा सढळ हस्ते वापर असलेला हनी केक म्हणून याचे नाव हनी केक - मसाला मारके असे केले. केक गार झाला की पिठीसाखर भुरभुरवा, गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घ्या.
- madhurad
- A Cook In The Making
- Posts: 4
- Joined: Thu May 08, 2014 6:42 pm
- Name: Madhura Deshpande
Re: हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)
भलताच देखणा आहे केक आणि त्याचे प्रेझेंटेशन!
मसाल्यामुळे म्स्त चव येत असेल ह्याला...इथे ही रेसिपी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
मसाल्यामुळे म्स्त चव येत असेल ह्याला...इथे ही रेसिपी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 3 guests