अता विस/एक वर्ष होत आली ही गाडी इथे आहे. आणी पहिल्यापासुन ह्याच नावानी फेमस आहे.- मधुची गाडी.

श्रमिक,भुकेले,टाइमपासी,खवैय्ये, असे नाना तर्हेचे लोक इथे येत असतात.मधुची गाडीही अगदी सक्काळी ७ ला रेड्डी असते.डेक्कनक्विन सारखी! हो...!,हे रोजचं टाइम आहे.चुकत नाही कधी. सकाळी सात ते दुपारी ३/४ वाजे पर्यंत...हे रोजचं गाडीचं टाइम. सुट्टी अशी इथे नाहीच. अहो खायच्या कामाला सुट्टी कशाला..?सातही वार खाण्याचे आणी तसाच इथला मेनुही.म्हणजे आंम्हा नेहमीच्यांना तो असा पाठ झालाय... बालगिताच्या बोलीवर...( बाकी जगात बालगिताच्या इतकी,समजायला आणी डोक्यात उतरायला सोप्पी बोली असताना,बाकिच्या विद्वान बोल्यांचा जन्मच कशाला झाला? हा आमचा प्रश्न...! )
सोमवार गुरवार शनिवार... साबुदाणाखिचडी इडलीसांबार
रविवार आणी बुधवार... भजी मिसळीवर शांम्पलची धार.
मंगळवार आणी शुक्रवार... मटार ऊसळ/ब्रेड बदाम शिर्याचा मार(म्हणजे या शिर्यात ''बदाम कुटून घातलाय...'' इति---मधुशेट...!)
हे येक नंबरी इडली सांबार.... विठ्ठल/रखुमाय सारखं एकजीव

पुणेरी सांबार! (यात असलेला फ्लॉवर आपल्या डिशमधे हवा असेल,तर "तंगडी येऊ द्या.." असा बारीक आवाज टाकण्याची इथे परंपरा आहे.


ही मटार ऊसळ/पाव/ हाप-भजी

आणि ही-उसळलेली तर्री!!!!!!!!!!!

भजीत भजी गोल भजी...(मटार ऊसळीबरोबर लै कातिल लागतात).

आणि अजुन एक खासियत म्हणजे हल्ली आधुनमधून कांद्याच्या-भावानी डोळ्याला पाणि आणलं,की मधुशेट भज्यांसाठी कांद्याच्या दुसर्या-भावाला अपॉइंट करतात..तो कोबी! पण ती भजी सुद्धा अशी की बर्याच जणांना हा जुळा भाऊ ओळखूच येत नाही.एकदम बेमालूम!

आणी या सगळ्याच्या जोडीला,पोहे+सांबार+शेव+दही, भजी/हाप भजी+कट छ्छा!(हे चहाचं पुणेरी रूप आहे....'छ्छा.!'), हे रोजचे पाशिंजर असतातच.
इथले सगळे पदार्थ...म्हणजे आमच्या लेखी ए-१... पण तरी ए-१ म्हणायला नको.त्या मेल्या सँडविच वाल्या सगळ्यांनी या उपमेतलं वैशिष्ठ्य त्यांच्या कर्तबगारिनी ठ्ठार मारलय. व्यावहारिकपणेच वर्णन करायचं झालं तर मधुची गाडी हा काँटिटी/क्वालिटी या दोन व्यावसायिक मुल्यांचा संगम आहे. आणी आमच्या मते हेच इथलं वैशिष्ठ्य आहे. माझा इथला सगळ्यात अवडता पदार्थ म्हणजे इडली सांबारशेव... इथली इडली म्हणजे सांबाराशी जन्मोजन्मीचं नातं असलेली,पटकन त्यात मुरणारी अशी असते.आणी सांबारही त्यात शिरताना आपपरभाव करत नाही. हे इडली सांबार मेड फॉर इच अदर आहे अगदी. चव तर इतकी कातिल असते. की कधी कधी मी दोन/दोन प्लेट हाणुन...(उरलेला दिवस घरी निवांत असेल तर! ) परत तेवढ्याच पार्सल सुद्धा घेतो.
पुन्हा इथे काय आहे,की सांबार असो,मिसळीचं शांम्पल असो,किंवा मटार उसळीचा रस्सा असो... तो हवा तेवढा प्लेटमधे अधुन मधुन येऊन पडत असतो. शेवंही भगवंताची कृपा घडल्या सारखी मधुन मधुन पडत असते. आणी इडली सांबार असो,किंवा मटार उसळ असो,त्या शेवेमुळे असा काही चविचा फ्लेवर तयार होतो,की एखाद दिवस शेव नसली (असं कधी होतच नाही म्हणा..!) किंवा वेगळ्या प्रकारची आलेली असली,तर आवडता मास्तर जाऊन कंटाळवाण्या सरांच्या हातात ''वर्ग'' किंवा तास पडल्या सारखी आमची अवस्था होते...मधुन मधुन मधु शेटचं ते ''मिर्ची फ्री'' हे संगीत ऐकू यावं लागतं,तेंव्हा या साळं'ची मज्जा येते. त्या महान ढगलबाज रव्या'ची बोली हा मधुशेटच्या गाडीवरचा असाच एक टेसदार प्रकार आहे. म्हणायला हा माणुस मधुशेटचा हेल्पर असेल,पण आमच्या लेखी हे पात्र-परिचय झाल्याखेरीज न उलगडणार एक स्वतंत्र नाटक आहे. हा माणुस शांम्पल असो,उसळीचा रस्सा असो,सांबार असो...कुठल्याही द्रवं-रूपा बद्दल बोलायला लागला की मदिरा-शास्त्रात शिरतोच...म्हणजे संबार वगैरे देताना ''(90) नैंटी टाकू का..?'' अशी भाषा...! सांबार उसळीतला फ्लॉवर बटाटा येऊ द्यायचा असेल तर,,, ''लेग-पीस असू दे का..?'' अशी गिर्हाइकाची केलेली विचारणा+संभावना..! तर्री देताना...'' कॉटर का हाप..?'' अशी एकंदरीतच,नवख्या आणी अजाण गिर्हाइकाची माप काढायची पेशल पद्धत!...असं सगळं तिथे आजुबाजुनी आणी जोडि/जोडिनी चाल्लेलं असतं.
अनुक्रमे....पहिला रव्या*...--^--^--^-- आणी मधुशेट

(* हल्लीच हा रव्या..जल्ला कोकनात गेला..तो आलांच नाय! आशी त्याच्या सह(न)कार्या कडनं खबर लागलीये.बहुधा तिकडं कोणितरी <em>गांवलं असेंल!</em>..

त्यात मधुशेटंही गिर्हाइकांची...कधी गिर्हाइकं त्यांची कळ काढत असतात. पोश्ट ऑफिस/एस.पी.कॉलेजातले शिपाई प्रोफेसर/ आजुबाजुच्या कार्यालय कचेर्यां मधली रोजची येणारी लोकं...काही महिला मंडळं इ. इ. सर्व इथे नेमानी येत असतात. शिवाय अगदी राजकीय क्षेत्रापासून ते सिने/नाट्य क्षेत्रातल्याही लोकांची मधुची गाडी हे फेवरिट ठिकाण आहे.

इथला कुठचाही पदार्थ घ्या...त्याचं पहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्याला असणारी पहिली चव मधुच्या गाडीची...मग ते आमचं आवडतं इडली सांबार असो,मटार उसळ असो,मिसळ असो,अथवा सगळ्या उपवासांना पुरुन उरणारी टेश्टी उपासाची मिसळ असो... इथले पदार्थ इथलेच...असे' दुसरीकडे मिळणार नाहीत. शेवटी या अश्या ठिकाणांचं थोडसं तीर्थक्षेत्रां सारखं असतं... जे तिथे आहे ते दुसरीकडे नाही,आणी दुसरीकडच्या सारखं इथे नाही...ते पहायला आणी शोधायला जाऊही नये. लॉर्ड्स'ला लॉर्ड्स सारखंच असू द्यावं,त्यात वानखेडेची मज्जा शोधायला जाऊ नये. आणी वानखेडेवर लॉर्ड्सची स्वप्न पाहू नये हेच खरं.
आंम्ही या श्टेडियमवरचे नेहमीचे हौशी प्लेयर आहोत,तुंम्हिही कधी आलात टिळक रोडला(पुणें येंथें..बंरं का! )..तर या इथे आणी खेळून जा एक/दोन डाव...!
