आमच्या देशात पेढे, चितळ्यांची बाकरवडी असले काही पदार्थ मिळत नाहीत मग असे काही खायचे असेल तर दोन पर्याय उरतात एक म्हणजे मायभूत गेले की खाऊन, बांधून घ्या नाहीतर इथे घरी करा.
लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला पेढे करायचे म्हणजे खवा घरी करण्यापासून तयारी, मग काहीतरी आयडिया लढवता येते का पाहिले आणि जादूची कांडी फिरून अवघ्या ५ मिनिटात पेढे फक्त वळायचे बाकी राहिले. तर यंदाच्या लक्ष्मीपूजनासाठीचे हे पेढे!
साहित्य-
१ कप मिल्क पावडर(मी नेस्ले ची निडो घेतली.),
५ ते ६ चमचे मिल्कमेड(नेस्लेचे मिल्कमेड घेतले),
२ टेबलस्पून साजूक तूप,
२ टे स्पून पिठीसाखर (मिल्कमेड गोड असते त्यामुळे साखरेची गोडी आवडीनुसार कमी जास्त करता येईल.)
वेलची, केशर स्वादासाठी, १ टे स्पून दूध- केशर खलण्यासाठी, बदाम पिस्त्याचे काप वरून लावण्यासाठी.
कृती-
केशराच्या काड्या कोमट दुधात भिजवा
तूप मायक्रोव्हेव मध्ये पातळ करून घ्या.
त्यात मिल्क पावडर घाला, मिल्कमेड घाला. एकत्र करा.
हाय पॉवर (@८०० वॅट) वर १ मि. मायक्रोव्हेव करा, बाहेर काढून ढवळा, त्यात वेलची पावडर व केशराचे दूध घाला.
चांगले ढवळून परत एक मि. मायक्रोव्हेव करा व बाहेर काढा.
आता मिश्रण पातळ झालेले दिसेल. परत ढवळा आणि अजून एकदा एक मिनिट मायक्रोव्हेव करा.
एवढ्या प्रमाणाला टोटल ३ मिनिटे ८०० वॅटवर मायक्रोव्हेव केलेले पुरते.
आता बाहेर काढून एकदा ढवळा आणि निवत ठेवा.
पूर्ण गार झाल्यावर चांगले मळा.
हाताला तूप लावून घ्या आणि पेढे वळा. बदाम पिस्त्याच्या कापाने किवा दूधमासाल्याने सजवा.
Who is online
Users browsing this forum: No registered users and 18 guests