आता फॉल आणि ऑक्टोबर दोन्ही सुरु झाले आहेत त्यामुळे सर्वत्र पानगळ, फॉलची विविध रंगछटा बघून खूप छान वाटतं. बाजारात ही लाल भोपळा भरपूर येऊ लागला आहे, ऑटम म्हटले की घरोघरी लाल भोपळ्याच्या अनेक पाककृती बनु लागतात, कुठे पम्पकिन ब्रेड, तर कुठे पम्पकिन केक, मफिन्स, पाय, स्पाईस्ड लाते. परवाच ग्रोसरीसाठी गेले असता पम्पकिन पाय स्पाईस पावडर दिसली मग काय लगेच पम्पकिन स्पाईस्ड मफिन्स बनवण्याचा घाट घातला

साहित्यः
१ कप मैदा
१ कप लाल भोपळ्याची प्युरी (नोट वाचा)
१/२ कप साखर (आवडीप्रमाणे घेऊ शकता)
१/२ कप दूध
१ अंडे
४ टेस्पून / ५७ ग्रा. गार बटर
१ टेस्पून पम्पकिन पाय स्पाईस पावडर (नोट वाचा)
१/४ टीस्पून मीठ
१ टीस्पून व्हॅनिला फ्लेव्हरींग
१ टीस्पून बेकिंग सोडा
अक्रोडाचे तुकडे
पाकृ:
चाळणीत मैदा, मीठ, बेकिंग सोडा व पम्पकिन पाय स्पाईस पावडर एकत्र करुन चाळून घ्या.
आता त्यात बटर घालून पेस्ट्री कटर किंवा बीटरने चांगले एकत्र करुन घ्या.
दुसर्या मिक्सिंग बाऊलमध्ये दूध, भोपळ्याची प्युरी, साखर, अंडे व व्हॅनिला फ्लेव्हरींग एकत्र करुन चांगले फेटून घ्या.

मैद्याच्या कोरड्या मिश्रणात अक्रोडाचे तुकडे घालावे.
त्यात आता अंड्याचे फेटलेले मिश्रण ओतून हलके फोल्ड / एकत्र करुन घ्यावे.
अव्हन २०० डीग्री सें. वर प्री-हीट करायला ठेवा.
मफिन ट्रेमध्ये मफिन लाईनर्स लावून तयार ठेवा.
आता मैदा + भोपळ्याचे मिश्रण थोडे-थोडे करुन प्रत्येक मफिन कपमध्ये घालावे.
ट्रे अव्हनमध्ये ठेवून, २०० डीग्री सें. वर १५-२० मिनिटे बेक करा.
बेक झाल्यावर टुथपिक घालून चेक करा, मिश्रण टुथपिकला चिकटले नाही म्हणजे मफिन्स नीट बेक झालेले आहेत.
कुलिंग रॅकवर काढून पूर्ण गार होऊ द्या.

पम्पकिन स्पाईस्ड मफिन्स खाण्यासाठी तयार आहेत.
मस्तं कॉफी आणि मफिन्सचा आस्वाद घ्या.
हॅपी फॉल यु ऑल

हवाबंद डब्यात स्टोअर करुन ठेवले तर ३-४ दिवस चांगले राहतात.
मफिन्स तयार झाल्यावर पूर्ण गार करुन फ्रीज केले तर महिनाभर टिकतात.
नोटः
१. लाल भोपळ्याची प्युरी घरी बनवायची असल्यास भोपळ्याचे मोठे तुकडे करुन बिया काढून घ्याव्यात. बेकिंग ट्रे वर भोपळा सालासकट १८० डिग्री. सें वर ४० - ४५ मिनिटे बेक करा.
बेक झाल्यावर, जरा गार होऊ द्यावे. मग साल काढून चमच्याने गर काढून घ्यावा. हा गर पाणी अजिबात न घालता मिक्सरला फिरवून घ्यावा. ही प्युरी तुम्ही मफिन्ससाठी वापरु शकता.
२. रेडीमेड, कॅनमधली प्युरी वापरायची असल्यास आवर्जून चेक करुन घ्या की ती पम्पकिन पाय बनवण्यासाठी तयार केलेली प्युरी नाहिये ते. पाय प्युरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्तं असते त्यामुळे ती ह्या पाककृतीसाठी चालणार नाही.
३. पम्पकिन पाय स्पाईस पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही
१ टीस्पून दालचिनीपूड + १ टीस्पून ऑल स्पाईस पावडर + १/४ टीस्पून लवंगपूड + १/४ टीस्पून आलेपूड + १/४ टीस्पून जायफळपूड एकत्र करुन पाककृतीत वापरु शकता.
४. साखरेच्या दिलेल्या प्रमाणात मफिन्स बेताचे गोड होतात, आवडीप्रमाणे प्रमाण बसवावे.
५. आवडत असल्यास साखर + दालचिनीपुड एकत्र करुन मफिन्सवर भुरभुरावी.