शेवटी दसर्याला सीमोल्लंघन करायचे असे ठरवून एकदाचा फिलिप्स अॅवन्सचा एअरफ्रायर बुक केला. नवरात्रातच तो घरी आला. लगेच खोका उघडून त्यात दाखवल्याप्रमाणे जोडणी केली. एकदा घरात आल्यावर नुसता मखरात बसवून ठेवून दसर्यापर्यंत काही धीर निघेना, त्यात असलेल्या माहितीपुस्तकात एक रंगीत चित्रांचे आकर्षक रेसिपी बुकही येते. आता हे सगळे बिनतेलात किवा अगदी कमीत कमी तेलातुपात करता येणार आहे हे दिसू लागले. मग पहिला गड फ्रेंच फ्राइजचा सर करायचे ठरवले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्राइज केल्या. पहिल्या किंचित जास्त खरपूस झाल्या पण नंतर मस्त जमल्या. डिशभर फ्राइज आपण फक्त चमचाभर तेलात त्या फ्राय केल्या आणि त्या मस्त झाल्यात हे समजल्यावर पहिला गड सर झाल्याच्या आनंदात तर जरा जास्तच खाल्ल्या.
साबुदाणे वडे, उपासाचे कबाब, कॉर्न कटलेट्स, पट्टी समोसे.. वॉशिंग्टनची कुर्हाड मग जोरात सुरू झाली. चुकत, प्रयोग करत शिकणं सुरू झालं. खुसखुशीत साबु वडे हाताला तेल न लागता खाण्याची खुमारी वेगळीच होती. कटलेट पलटताना जाळीला चिकटल्यावर थोडा हिरमोड झाला पण नंतर ते जेव्हा तयार झाले तेव्हा ते अजिबात मोडले नाहीत. पट्टी समोसे आणि स्प्रिंग रोल भारी तेल पितात म्हणून करणे टाळते पण आता ह्या एअरफ्रायरमध्ये एक चमचा तेलात मात्र ते फारच सुरेख झाले. मग आमचा मोर्चा कोथिंबिर वडी, वांग्याचे काप आणि कांदाभज्यांवर वळला. फक्त ग्रिझिंग केलेली कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबिर वडी, कांदा भजी आणि काप गिल्टफ्री मनसोक्त खाल्ले. (सगळं एकाच वेळी नाही केलं, वेगवेगळ्या दिवशीचे प्रयोग!) भरड्याचे वडे, थालिपिठं साफ फसले. तर भाजणीचे वडे, पुर्या अशा बर्याच मंडळींवर प्रयोग करणं बाकी आहे. एकेक पदार्थ एक्सप्लोअर करणं चालू आहे.

दसर्याला एअर फ्रायर मध्ये गुलाबजाम करायचे ठरवले. मी भारतातून येताना चितळेंचे पाकिट आणले होते. अर्धेच पाकिट वापरून पाहू. प्रयोग फसला तर आपले नेहमीसारखे तळू असा विचार केला. गु जा मंद तळावे लागतात म्हणून जरा जालावर आधी शोध घेतला. संजय थुम्माही मंदाग्नीवरच तळायला सांगत होता.एअर फ्रायरही १४० अंश से वर ठेवा असंही सांगत होता. पण त्याने मोठा लंबगोल करून अर्धा कापायला सांगितला. तसले काही न करता मी आपले नेहमीसारखे करायचे ठरवले. ठेवले १४० अंशावर. १०/१२ मिनिटांनी बाहेर काढून पलटले पण ब्राउनिंग यायचे लक्षण नाही. परत १० मि. ठेवले तरी आपले ते पांढरे ते पांढरेच .. अर्ध्या तासानंतर त्याला ब्राउनिंग आलं. बाहेर काढले तर नुसते कडक.. एकमेकांना फेकून मारावेत असे.. एक गु जा घेतला आणि सुरीने अॅपल कापावे तसा कापला. तर आतमध्ये छान सॉफ्ट! मग ते उरलेले कडक गुलाबजाम तसेच पाकात घातले. नव्हे नव्हे गरम पाकात अगदी बुडवलेच. दुसर्या दिवशी पाहिले तर ते अगदी छान सॉफ्ट झाले होते! शुभारंभाचा प्रयोग तर छान झाला. हुरुप आला आणि मग उरलेले पाकिटही एअरफ्राय केले.
ह्यात बेकिंग करता येते हे माहित होते. माझा जिव्हाळ्याचा कोपरा हा! त्यामुळे केक प्रयोग तर करायला हवाच होता. माझ्या बेकर्स बास्केटमध्ये मग एअरफ्रायरचा रिकोटा लेमन केकही आला.

सध्या मी खूष आहे. 'हवा के साथ साथ..' नवे नवे प्रयोग करते आहे. कधीकधी प्रयोग फसतो आहे तर कधी फारच छान होतो आहे. 'एअरफ्रायर नको.. पण पदार्थ करणं आवर' अशी वेळ यायला नको हे मात्र स्वत:ला बजावलं आहे.
