मांसाहारी पाककृती

भरले खेकडे

सर्व मांसाहारी (आणि अंडे असलेल्या) पाककृती

भरले खेकडे

Postby jaagu » Thu Jul 17, 2014 2:51 pm

प्रमाण ७-८ खेकड्यांसाठी लागणार्‍या जिन्नसाचे देत आहे. मी जास्त खेकड्यांसाठी केले आहे फोटोत.
७-८ खेकडे

रश्यासाठी
४ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
आल्,लसुण्,मिरची कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
१ चमचा गरम मसाला
चविनुसार मिठ
पाव वाटी तेल
पाणी गरजे नुसार



लिंबा एवढ्या चिंचेचा चिंचेचा कोळ (जास्त घेऊ नये.)


कांदा खोबर्‍याचे वाटण
साधारण पाऊण सुक्या खोबर्‍याची वाटी किसून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून



भ्ररायचे सारण.

१ मोठी वाटी बेसन (अंदाज येत नसेल तर थोड जास्त घेतल तरी चालेल)
पाव वाटी तांदळचा पीठ
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद पाऊण चमचा मसाला
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
१-२ चिंचेचा कोळ (लिंबापेक्षाही कमी आकार होतील इतका चिंचेचा गोळा)




पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ.

खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.

अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात. पण मी आणते त्या अनुभवा वरून तसे मला काही आठळले नाही. कधी कधी मिळतात भरलेले तर कधी कधी नाही. तर भरलेले खेकडे ओळखण्यासाठी खेकड्याची पाठ दाबून पहावी. दाबताना जर पाठ वाकत म्हणजे आत सहज जात असेल तर तो पोकळ आणि जर कडक असेल तर तो भरलेला खेकडा. शिवाय चांगल्या लाखेसाठी माद्या जास्त बघून घ्यायच्या. जर आपल्याला खेकड्यांचे पाय काढता येत नसतील तर ते शक्यतो कोळणींकडूनच काढून घ्यायचे.

खेकड्यांच्या पाठीच्या आकारा वरून नर-मादी ओळखायची. खालील फोटोतील पहीला नर खेकडा, दूसरी मादी खेकडा (खेकडीण किंवा मिसेस खेकडीण म्हणायची का? :हाहा:)



आता बर्‍याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते म्हणून हे खेकडे पिशवीत बांधून फिजर मध्ये ठेवा. साधारण १ तासानंतर ते पूर्णपणे मंद होतात. मग आरामात ह्यांचे पाय काढता येतात. काही जण बाजूच्या दोन मिशांसारख्या :हाहा: नांग्या ठेवतात. पण त्या ठेवल्याने भांड्यात जागा कमी पडते म्हणून मी ठेवत नाही.




तर आता पाककृती कडे वळू.
खेकड्यांचे पाय काढले की खेकडे आणि त्याचे पुढचे जे जाडे पाय (नांगे) स्वच्छ धुवून घ्या.





बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.

आता खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे खेकड्याच्या कडेच्या मधोमध टोकदार जाडी टोकदार वस्तूच्या सहाय्याने खेकड्याची पाठ व पोट वेगवेगळे करा.





ह्यांच्या मध्ये जर काळसर छोटी पिशवी सारखे करखरीत वाटले तर तो भाग काढा.



आधीच पिठाचे पुढील प्रमाणे सारण करून ठेवा.
बेसन थोडे भाजून घ्या. त्यात तांदळाचे पिठ, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ टाकून थालीपिठा एवढे घट्ट करा. अगदी पातळ नकोच. चिंचेचा कोळही प्रमाणातच वापरा. जास्त नको.





आता हे सारण खेकड्याच्या पोटाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या खाचेत तसेच पाठीच्या मध्य भागात भरून घ्या.



आता पाठ आणि पोट पुन्हा एकत्र जुळवा. पहिल्यांदाच केल्यामुळे एकत्र राहणार नाही असे वाटत असेल तर दोर्‍याने बांधून घेतले तरी चालेल.



राहिलेल्या पिठाचे गोळे करून बाजूला ठेवा. ते नंतर रश्यात सोडता येतात.
आता आपण रस्सा करायला घेऊ.

भांड्यात तेल गरम करून त्याला लसूण पाकळ्यांची फोडणी द्या. त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतवा.



ह्यावर आले- लसुण पेस्ट टाकून परता मग त्यात हिंग, हळद मसाला घालून ढवळा व १ ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त गरजे नुसार पाणी घाला आणि खेकडे अलगद त्यात ठेवा.



वरून खेकड्यांचे मोठे नांगे टाका.



आता झाकण टाकून चांगले उकळू द्या. पाणी भांड्या बाहेर जाईल असे वाटत असेल तर थोडी गॅप ठेवा झाकणात.

एकीकडे कांदा खोबर्‍याचे वाटण करायला घ्या.
कांदा अगदी चमचाभर तेलात भाजून घ्या. नंतर सुके खोबरे बाजून घ्या.



थंड झाले की मिक्सर मधून वाटून घ्या.



रस्सा उकळत असताना मधूनच हलक्या हाताने ढवळून घ्या. पहिल्या उकळी नंतर ढवळल्या नंतर पिठाचे केलेल गोळे रश्यात शिजण्यासाठी सोडा.

साधारण १५ ते २० मिनीटे तरी मध्यम आचेवर हा रस्सा उकळू द्या. पाण्याची गरज वाटल्यास मधून पाणी टाका. आता २० मिनीटां नंतर ह्यात चिंचेचा कोळ घाला नंतर खांदा-खोबर्‍याचे वाटण, मिठ गरम मसाला घाला. व पुन्हा चांगली उकळी येऊ द्या.



उकळले की गॅस बंद करा. वाटल्यास थोडी चिरलेली कोथिंबीर स्वादासाठी वरून पेरा.

तय्यार आहे पिठ भरल्या खेकड्यांचा रस्सा.




अधिक टिपा:

बहुतेक टिपा मी वर दिल्या आहेतच. तरीपण चिंच कमी घाला. कारण चिंबोर्‍याचा रस्सा इतर माश्यांप्रमाणे आंबट चांगला नाही लागत. फक्त वास मोडण्या करीता चिंचेचा वापर केला आहे.

लाख म्हणजे काय हा ही प्रश्न बर्‍याचदा विचारला आहे म्हणून खालील आख्खा शिजवलेला खेकडा लाखेने भरलेला. लाख अंडे किंवा गाभोळीच्या प्रकारात मोडते.



बर्‍याच व्हेजी मेंबर्सला हे फोटो पहावणार नाहीत पण बर्‍याच जणांनी मला ही रेसिपी विचारली होती म्हणून डिटेल मध्ये दिले आहे.
jaagu
A Cook In The Making
 
Posts: 3
Joined: Thu May 01, 2014 10:41 pm
Name: Prajakta Mhatre

Re: भरले खेकडे

Postby manish » Thu Jul 17, 2014 3:45 pm

शाकाहारी असल्यामुळे माझा 'पास', पण सी-फुड आवडणार्‍या मित्रांकडून बरेच ऐकले आहे खेकड्यांविषयी. त्यांना नक्कीच आवडेल ही रेसिपी. :)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मांसाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest