शुक्रवारी पानं मिळतीलच ही खात्री होती म्हणुन फदफदं करायचा बेत फिक्स होता. दोन दिवस आधीच वाल भिजत घातले होते. शनिवार पर्यंत मोडही आलेले. आईला फोन करुन एकादा पाककृतीची उजळणी करुन घेतली. हो आयत्यावेळी पोपट नको व्हायला काय?
१ वाटी/बाऊल बिरडं. (सोललेले वाल)
१ नग मध्यम आकाराचा कांदा
५-६ अळूची पानं देठां सकट
१-२ हिरव्या मिरच्या
वाल नसले तर चणे/चणाडाळ ही चालेल.
फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, असल्यास कडीपत्याचं पान.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, २ पेर दालचीनी, १ १/२ चमचा आलं-लसुण पेस्ट.
चिंच-गुळ, मीठ स्वादानुसार.
अळूची पानं बारीक चिरुन घ्यावी. देठाची सालं काढून त्याचे ही बारीक तुकडे करुन घ्यावे.
मिरच्यांना उभा चर देऊन तुकडे करुन घावे. कांदा मध्यम,लांब-उभा चिरुन घ्यावा.
मोहरी, मिरची, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी करुन त्यात कांदा, हळद टाकुन परतावं.
नंतर त्यात अळूचे देठ आणि चिरलेली पानं घालावी. लाल तिखट, किंचीत मीठ भुरभुरुन एकत्र करावं.
अळूची पानं थोडी बसली की मग त्यात आलं-लसुणाची पेस्ट टाकावी, गरम मसाला, दालचीनीची वाटुन टाकावी.
नंतर त्यात बिरडं घालुन हलक्या हातानं सगळं एकत्र करुन घ्यावं. चवी नुसार मीठ घालावं.
थोडंस पाणी टाकून, वर झाकण आणि त्यात पाणी ठेऊन मंद आचेवर भाजी शिजत ठेवावी. (चणा असेल तर कुकरला लावली तरी चालेल, पण बिरड्याचं अगदीच पीठ होऊन जातं तेव्हा शिट्या घेताना काळजी घ्यावी.)
वाल संपुर्ण शिजले की मगच त्यात चींचेचा कोळ आणि गुळ टाकुन पुन्हा उकळी आणावी. रस भाजी हवी असल्यास गरजे नुसार पाणी वाढवावं किंवा मग आटवावं.