शाकाहारी पाककृती

मूगाची कचोरी

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

मूगाची कचोरी

Postby swatidinesh » Tue Nov 22, 2016 7:15 pm

खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे.
सकाळी १०-११ च्या सुमाराला तिथे गेलात तर बरेचदा मस्त गरमागरम मूग कचोर्‍या मिळतात. म्हणजे एरवीही मिळतात पण गरमागरम हव्या असल्या तर तेथे सकाळी जा. नाहीतर मग मी सांगते तशा करून खा.
ह्या कचोर्‍या तशा टिकाऊ आहेत पण नो वन कॅन इट जस्ट वन.. म्हणत फस्त केल्या जातात.
तर ही कचोरी इथे जर्मनीत मनात येईल तेव्हा कशी बरं मिळणार? मग स्वतःलाच कामाला लावावे लागते. असो, नमनाला घडाभर तेल खूप झाले.. कचोर्‍याही तळायच्या आहेत त्याला तेल लागणार आहे ना..

तर ह्या कचोर्‍यांसाठीचे साहित्य-

सारणासाठी- १ वाटी मूग डाळ, २ चमचे बडिशेप, ३ ते ४ चमचे धने जीरे पूड, चमचाभर आमचूर, २ चमचे लाल तिखट, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ३ ते ४ चमचे साखर, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबिर, २ पळ्या तेल

आवरणासाठी- २.५ वाट्या मैदा, पाउण वाटी तूप, मीठ, लिंबाच्या रस चमचाभर- साधारण दोन छोट्या फोडींचा रस, कोमट पाणी

तळणीसाठी- तेल किवा ए फ्रा

सारणाची कृती-

मूगाची डाळ व बडिशेप साधारण तीन तास तरी भिजत घाला. नंतर उपसून वाटा, वाटताना पाणी कमीत कमी ठेवा.
एका कढईला तेलाचा हात लावून तिच्यात २ पळ्या तेल तापत ठेवा. त्यात तीळ व खसखस घाला. नंतर ही मूगाची वाटलेली डाळ घाला. थोडे परतून घ्या.
मग तिखट, धनेजीरे पूड, मीठ घाला.
आच मोठी ठेवून परतत रहा. वाटल्यास अधून मधून पाण्याचा हबका मारा.
मिश्रण मऊ व मोकळे झाले पाहिजे.
आच बंद करून साखर घाला,
आमचूर व कोथिंबिर घाला.
मिश्रण ढवळून एकसारखे करा.

आवरणाची कृती-

तूप पातळ करून घ्या.
मैद्यात छोटा चमचाभर मीठ घाला. लिंबाचा रस घाला.
लिंबाच्या रसामुळे आवरणाला क्रिस्पीनेस येतो.
त्यात हे गरम केलेले पातळ तूप घाला.
हवे तसे कोमट पाणी घालून मळा.
फार घट्ट नको, किंचित सैलसरच गोळा बनवा व १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
ह्याच्या छोट्या पुर्‍या लाटून त्यात मूगाचे सारण भरा, कडेने बंद करत आणा व बंद केलेला भाग खाली ठेवा.
तसेच तळतानाही बंद केलेला भाग खाली ठेवून तेलात सोडा व कचोरी तेलात सोडताना आच मोठी ठेवा, नंतर तळताना मध्यम आच करा. म्हणजे कचोरी फुटणार नाही.

ए फ्रा मध्ये करायच्या असतील तर-
ए फ्रा २०० अंशावर प्रिहिट करा.
कचोर्‍यांना ऑइल ब्रशिंग करून घ्या.
आधी ६ मिनिटे, मग पालटून ६ मिनिटे मग १८० अंशावर २ ते ३ मिनिटे ए फ्रा करा.
गोल्डन गुलाबी रंग आला नसेल तर अजून एखादा मिनिट ए फ्रा करा.

दोन्ही प्रकारे केलेल्या कचोर्‍यांचा फोटो देते आहे. मुद्दाम एकाच वेळी दोन्ही प्रकारे केल्या. चवीत फारसा फरक जाणवला नाही.

तेलात तळलेल्या कचोर्‍या-


ए फ्रा मधील कचोर्‍या-
swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: मूगाची कचोरी

Postby manish » Sun Dec 04, 2016 12:40 am

कचोरी आणि त्याची कथा, दोन्हीही मस्त खुसखुशीत आहे! :-)
अजून एका मस्त पाककृतीबद्दल धन्यवाद!
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest