शाकाहारी पाककृती

उपासाचे कबाब!

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

उपासाचे कबाब!

Postby swatidinesh » Wed Oct 21, 2015 11:51 pm

नवरात्रीचे नऊ दिवस उपास माझा नवरा गेली कित्येक वर्षे करतो.. पहिल्या २-३ माळा झाल्या की मग दूध, फळांवरून हळूहळू गाडी सा. खि., बटाट्याचा,रताळ्याचा किस, उपासाच्या भाजणीची थालिपिठ यावर येऊन ठेपते. काहीतरी वेगळे हवे आणि जास्त स्टार्ची,ऑयली नको अशी 'आखूडशिंगी बहुदुधी' डिश हवी असते. ह्यावर्षी ह्या मोडवर आल्यावर त्याने माझं डोकं न खाता चल जरा इंडियन स्टोअर मध्ये जाऊ असा विचार मांडला. तेथे गेल्यावर हा सुरण शोधू लागला. आता आम्ही काही राणीच्या देशात राहत नाही, ना उसगावात.. त्यामुळे आपल्याला हव्या त्या भारतीय गोष्टी हव्या तेव्हा मिळतीलच अशी खात्री अजिब्बात नसते आणि त्या परंपरेला अनुसरून सुरण काही मिळाला नाही.मग ह्या बाबाने लहानशी कच्ची पपई उचलली. "अरे ती पिकेपर्यंत दसराही होऊन जाईल, त्यापेक्षा पिकलेलीच घे ना.." ह्या माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केळावेफर्स करतो ती कच्ची केळी घेतली. "अरे,अरे.. ही तयार केळी घे ना.. " हे माझे म्हणणे बहुदा आजूबाजूच्या लोकांनीच ऐकले फक्त..

आता ह्याचे काय करायचे? ते कळू शकेल का मला? ह्या माझ्या प्रश्नाचे मात्र लगेच उत्तर आले.. कबाब!

"क्काय?" मी दुकानात आहे हे विसरून किंचाळलेच. "कबाब? अरे उपास आहेत ना तुझे? कबाब कसले करतोस?"

"अग बाई, उपासाचे कबाब! " "हॅ.. काहीतरी फेकू नकोस. मला फक्त शिगकबाब, रेशमी कबाब गेला बाजार हराभरा कबाब माहित आहेत आणि दसर्‍याच्या आधी मी ह्यातलं काहीही करणार नाहीये.." इति मी.. आमचे 'प्रेमळ संवाद' सुरू झालेत हे लक्षात आल्यावर पैसे चुकते करून तिथून बाहेरच पडलो.

घरी येताना म्हटले हे असं काही नसतं, उपासाचे कबाब बिबाब मी पहिल्यांदाच ऐकतेय. तर त्यावर दिनेश म्हणाला, "इंजिनिअरिंगला असताना आम्ही हे उपासाचे कबाब खायचो नेहमी, एका उडप्याच्या हाटेलात. त्यालाच एकदा ते मेसमध्ये बनवायला सांगितले आणि मेसच्या आचार्‍याला रेसिपी शिकायला लावली. मग आमच्या मेसमध्येही बरेचदा होत असत." दिनेश मनाने कॉलेजच्या दिवसात पोहोचला होता. त्यामुळे मेसच्या आचार्‍याकडून ह्याने कधी ती रेसिपी शिकली हा प्रश्न मनातच ठेवून कसे आणि काय करायचे ते सांग? म्हणत मी एकीकडे त्याच्या नकळत दुसरा ऑप्शन म्हणून बटाटे उकडून ठेवले आणि फळे आहेत ना ते पाहून ठेवले. हा प्रयोग फसला तर .. अशी शंका मनात होतीच पण बोलून दाखवता येत नव्हती.

एका मोठ्या केळ्याचे सालासकटच मोठे दोन तीन तुकडे करून ती सालं काळी होईपर्यंत मायक्रोवेव केली.(८०० वॅटला साधारण ३ते ४ मिनिटे)
पपई अर्धी चिरली.मग साल काढून किसली आणि तीही मायक्रोतून वाफवून काढली.(८०० वॅटला आधी ३ मिनिटे ,मग बाहेर काढून एकदा वरखाली करून परत २ मिनिटे) आणि उरलेली अर्धी पपई फ्रिजमध्ये 'आ' वासून पडली.
लागले तर असू देत म्हणून उकडून ठेवलेल्या बटाट्यातले २ मध्यम बटाटेही घेतले.(सुरण नव्हता ना, नाहीतर तो सुध्दा साधारण २ बटाट्यांच्या एवढा घेतला असता.)
४-५ हिरव्या मिरच्या, बचकभर कोथिंबिर आणि चमचाभर जिरं वाटले. त्यातलं चमचाभर वाटण बाजूला काढले.
केळ्याची सालं काढून ती किसली. त्यावर उकडलेले बटाटे किसले त्यात वाफवलेला पपईचा किस असे तिन्ही किस एकत्र केले. त्यात जिरं मिरचीचे वाटण,आणि मीठ घातले,थोडे लिंबू पिळले आणि हलके मळले. चक्क गोळा तयार झाला.
आता ह्याचे हराभरा कबाब सारखे कबाब कर.. असा हुकूम आला. मग त्याचे कबाब तयार केले.





हे कबाब शॅलो फ्राय केले.
वाडगाभर दह्यात एक मोठा चमचाभर दाण्याचं कूट, मीठ आणि मिरची+कोथिंबिर+ जिर्‍याच्या वाटणातलं चमचाभर वाटण घातलं. (समजलं आता चमचाभर वाटण बाजूला का काढून ठेवलं ते..)
गरम गरम कबाब त्या दह्यातल्या इन्स्टंट चटणी बरोबर चक्क चांगले लागत होते. म्हणून हा रेसिपी प्रपंच!
(आता ह्या सगळ्या गोष्टीतून रेसिपी शोधून काढायला सोपे जावे म्हणून ती वेगळ्या रंगात लिहिली आहे.)

swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: उपासाचे कबाब!

Postby manish » Thu Oct 22, 2015 4:37 pm

अरे वा!!!! मस्त्च अहेत हे 'उपासाचे कबाब'...आणि लिहायची स्टाईलही खूप आवडली! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 4 guests