शाकाहारी पाककृती

प्लम रेलिश / चटणी

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

प्लम रेलिश / चटणी

Postby Sanika » Sat Sep 05, 2015 1:19 am

गेल्या वर्षी बागेत प्लमचे झाड अगदी फळांनी लगडले होते, भरपूर खाऊन, मित्र-परिवारात वाटून ही काही संपेना, ह्या वर्षी ठरवले होते की प्लम लागले की खाऊन उरतील त्याची चटणी, जॅम असे काही बनवायचे , पण ह्यावर्षी फुलं तशी कमीच फुलली मग फळं ही त्यामनाने कमीच लागली, दोनदा काढून खाऊन झाले मग म्हटले आता जी उरली आहेत त्याची चटणी करु, तर ही प्लमची आंबट-गोड-तिखट चटणी / रेलिशची पाकृ देतेय.



साहित्यः

१२-१५ पिकलेली प्लम्स (आमच्याकडे व्ह्किटोरिया जातीची प्लम्स आहेत, कोणतीही पिकलेली प्लम्स घेऊ शकता)
साधारण १/२ वाटी चिरलेला गुळ (प्लम्सच्या गोडीनुसार गुळाचे प्रमाण घ्यावे)
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून बडीशेप
३-४ लवंगा
१/२ इंच आले किसून घेणे
१-१/४ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार





पाकृ:

प्लमस स्वच्छ धुवून, बिया काढून, बारीक फोडी करुन घेणे.
पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, लवंगा घालून फोडणी करणे.
मोहरी तडतडली की जीरे व बडीशेप घालून परतणे.
आता त्यात चिरलेले प्लम्सचे तुकडे घालून ५ मिनिटे परतणे.
प्लमला पाणी सुटून ते मऊसर होतील, जमेल तसे चमच्याने गर दाबून घ्यावा.
आता त्या किसलेले आले व मीठ घालून घेणे.
दोन मिनिटे परतल्यावर त्यात लाल तिखट व गुळ घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहणे.
४-५ मिनिटांनी मिश्रणातील ओलसरपण कमी होऊन मिश्रण दाट होऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करावा.
चटणी पूर्ण गार होऊ द्यावी.



स्टरलाईज्ड बर्णित चटणी भरुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकते.



ही चटणी तोंडीलावणे म्हणून किंवा पराठे, ब्रेड, पॅनकेक्ससोबत किंवा क्रॅकर्स व चीझसोबत सर्व्ह करु शकता.

Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: प्लम रेलिश / चटणी

Postby manish » Sat Sep 05, 2015 11:47 am

अहाहा......काय सुंदर रंग आहे ह्या रेलिशचा? लगेच उचलून खावेसे वाटते! नुसते फोटो बघुनच तोंडाला पाणी सुटतेय!! :-)
इतके सुरेख घरचे प्लम - भाग्यवान आहेस खरंच! बाकी देखणे प्रेझेंटेशन आणि व्यवस्थित तपशीलवार रेसिपी बद्दल नवीन काया लिहणार?
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट!! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests