साहित्य सारणः
१ वाटी फ्रोझन मटार (तुम्ही कच्चे मटार घेतले तर ते आधी बोटचेपे वाफवून घ्या)
१ टेस्पून आले+ हि.मिरची+ कोथींबीर पेस्ट
१ टेस्पून खवलेला ओला नारळ
१ टीस्पून लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून साखर
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून आले+ हि.मिरची+ कोथींबीर पेस्ट घालून परतावे.
त्यात मटार घालून थोडे मॅश करून घ्यावे.
आता त्यात ओले खोबरे, कोथींबीर, मीठ, साखर व लिंबाचा रस घालून परतून एक वाफ काढावी.
सारण शिजले की गॅस बंद करून गार होऊ द्यावे.

साहित्य उकडः
१/२ वाटी दूध + १/२ वाटी पाणी
१ वाटी तांदूळपिठी / मोदकपिठी
मीठ
थोडे तूप
पाकृ:
एका भांड्यात दूध + पाणी व तूप घालून उकळायला ठेवावे.
तांदूळपिठीत मीठ मिक्स करुन घ्यावे.
दुध-पाण्याला उकळी फुटली की त्यात तांदूळपिठी घालावी व ढवळून एकत्र करावे.
मंद आचेवर एक-दोन वाफा काढाव्यात.

उकडीला ताटात काढून गरम असताना तेल-पाण्यच्या हाताने खूप मळावे.
मळून त्याचे छोटे गोळे तयार करावे.
प्लॅस्टिक पेपर किंवा रिक्लोझेबल बॅगेला तेलाचा हात फिरवून घेणे व त्यावर मळलेल्या उकडीचा गोळा ठेवून छोटी पूरी लाटावी.
त्यावर चमचाभर मटाराचे सारण भरून दोन्ही बाजुने पुरीची घडी घालावी.
मग उरलेल्या दोन्ही बाजूंची घडी एकमेकांवर घालावी.
सर्व तयार केलेले दिंडे उकडण्यासाठी १५-२० मिनिटे मोदकपात्रात ,कुकर किंवा मोठ्या भांड्यात चाळणीवर ठेवावे.

गरमच सर्व्ह करा.
खरं तर हे असेच नुसते छान लागतात खायला पण हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर ही सर्व्ह करु शकता.
नोटः
तुम्ही दिंडे / दिंड ऐवजी उकडीचे तिखट मोदक ही बनवू शकता
