साहित्य:
१ वाटी हरभरा डाळ (चणा डाळ)
१ वाटी तूर डाळ
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
१ चमचा धणेपूड
१ चमचा जिरेपूड
४-६ कढीपत्त्याची पाने
१ चमचा साखर
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
२ वाट्या तांदूळ भातासाठी
फोडणीसाठी:
१ वाटी तेल
२ चमचे मोहरी
३-४ लसूण पाकळ्या (आवडत असल्यास)
३-४ सुक्या लाल मिरच्या
अर्थातच आवडीनुसार लसूण आणि मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
कृती:
तूर डाळ आणि हरभरा डाळ ६-८ तास भिजवून ठेवावी. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सर मधून भरडसर वाटून घ्याव्या. या वाटलेल्या मिश्रणात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, किंचित साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने सगळे एकत्र करावे.
या मिश्रणाचे छोटे गोळे करावे. या साहित्यात १४-१६ गोळे होतात.
हे गोळे ढोकळा वाफवतो तसे वाफवून घ्यावे. वाफवण्यासाठी इडली पात्र, स्टीमर किंवा कुकरला शिट्टी न लावता अशा कुठल्याही प्रकारे वाफवले तरी चालतात. साधारण १०-१२ मिनिटे वाफवण्यासाठी पुरेसे आहेत. मायक्रोवेव्हचे इडली पात्र असेल तर त्यातही वाफवू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये ४-५ मिनिटे लागतात. माझी आजी भात शिजत आला की त्यावरच हे गोळे वाफवायची. ही अगदी पारंपारिक पद्धत. पण यासाठी वेळेचा अंदाज अचूक लागतो. त्यामुळे मला असे वेगळे वाफवणे सोपे वाटते.
बासमती शिवाय कुठल्याही तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा.
तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि लसूण घालून फोडणी करावी.
आता भात, त्यावर हे गोळे कुस्करून आणि त्यावर फोडणी घालावी. गोळा भात तयार आहे.
सोबत ताजे लोणचे असेल तर अधिकच रंगत येते. यासोबत नेहमी ताक अथवा मठ्ठा केला जातो. मी सोलकढी केली होती. हे कॉम्बिनेशन पण चांगले लागत होते.
