साहित्य -
२ घट्ट गराचे पिकलेले गोड आंबे फोडी करुन (बदामी, लंगडा किंवा हौस असल्यास हापूस, पण पायरी किंवा तत्सम रसाचे आंबे नको)
३-४ सुक्या लाल मिरच्या
५-६ टेबलस्पून तीळ
१ कप चिंचेचा कोळ
थोडा गुळ (२-२.५ टेबलस्पून) - साखर नको. ह्याची खरी खुमारी
मीठ चवीनुसार
१ लहान चमचा हिंग
२ लहान चमचे मोहरी
१ लहान चमचा मेथी दाणे
१ लहान चमचा कढीपत्ता
आणि २ टेबलस्पून तेल किंवा साजूक तूप (चव तुपातच मस्त लागते)
आधी पॅनमधे तीळ आणि लाल मिरच्या खमंग भाजून घ्या. तीळ ब्राऊन झाले पाहिजे पण जळायला नको. मिरच्या आणि भाजलेले तीळ ह्याचा मस्त खमंग वास आला पाहिजे! मिरच्या आणि भाजलेले तीळ मग मिक्सरच्या छोट्या जार मधे काढुन घ्या.
मिरच्या आणि भाजलेले तीळ
मग पॅन किंवा कढईत २-२.५ कप पाण्यात कापलेले आंबे मंद आचेवर शिजत ठेवा. थोडे पाणी गरम झाले की त्यात गुळ टाकून शिजू द्या. पिकलेला आंबा आणि गुळ ह्याला एक मस्त तृप्त करणारी चव देतात.
हे शिजत आहे तोवर मिक्सर मधे मिरच्या आणि भाजलेले तीळ ह्यांची बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यात हळूहळू चिंचेचा कोळ घालून जाड/घट्ट अशी पेस्ट बनवा. (मी चुकून पाणी जास्त घातले, म्हणून पेस्ट अशी पातळ झाली) उरलेला चिंचेचा कोळ करीत टाकता येतो.
आता ही तिखट पेस्ट आंबे शिजत असलेल्या पाण्यात टाकून चांगलीच मिक्स करा. उरलेला चिंचेचा कोळ आता टाकता येईल.
चव घेऊन पहा, गोड आणि आंबट चवीबरोबरच एक खमंग तिखट चव लागली पाहिजे. आता ह्यात मीठ आणि हवे असल्यास थोडे तिखट घालून शिजू द्या.
ह्याला उकळी येईपर्यंत एका लहान कढईत २ चम्चे तूप तापवून त्यात मोहरीची फोडणी तयार करा, मोहरी तडतडली की गॅस बंद करून मेथी दाणे, हिंग आणि कढीपत्ता टाकून ही फोडणी उकळत्या करीत टाका. गरमागरम 'स्वीट एन स्पाईसी मँगो करी' तय्यार!
ह्याची आंबट-गोड आणि खमंग तिखट चव जिभेवर मस्त रेंगाळत राहते. पोळी किंवा त्याहीपेक्षा गरम हातसडीच्या (ब्राउन राईसच्या) भाताबरोबर भन्नाट लागते (हा फोटो जरा गंडलाय, करीच्या घमघमाटाने पोटात कावळ्यांचा हिमेश रेशमिया झाला होता).
दुपारी जेवायला गरम भात आणि ही करी, आणि मग मस्त कुलरच्या/ए.सी. च्या थंड हवेत पुस्तक वाचत लोळणे - उन्हाळ्यातला रविवार असा छान सत्कारणी लागतो! (शिवाय, "मी नाही का रविवारी ती मस्त मँगो करी केली होती?" असा बायकोवर (किवा नवर्यावर) एक पॉईंटही सर होतो त्याचे सुख वेगळेच!
![Wink ;-)](./images/smilies/icon_e_wink.gif)